वैष्णवी वधू-वर सूचक केंद्र

'लग्नगाठी या स्वर्गातच बांधल्या जातात...!' अगदी खरं आहे, पण, पृथ्वीवर या दोन जीवांची भेट घडवून आणण्यासाठी कुण्या एका माध्यमाची जरूर आवश्यकता असते. तेच नाममात्र माध्यम होण्याची आंतरिक ओढ आणि त्यासाठी पूरक असणारा जनसंपर्क या बाबी प्रामुख्याने वैष्णवी वधू-वर सूचक केंद्र स्थापनेला उद्युक्त करणाऱ्या ठरल्या.

सराफ कानडखेडकर परिवाराचे मुख्य आधारस्तंभ असणारे स्व. माधवराव सराफ हे जुन्या पिढीतील सामाजिक चळवळीतील एक अग्रगण्य नाव. गोवा मुक्तीसंग्राम, हैदराबाद मुक्तीसंग्राम ते अगदी ललित कला मंडळासारख्या सांस्कृतिक केंद्राची उभारणी, अगदी काहीही असो, माधवराव आण्णा स्वतःला त्या कार्यात झोकून द्यायचे. पुढे एका कला शिक्षकाने उभारलेला व्यवसाय हे त्यांच्या सचोटीचे आणि या प्रत्येकच व्यवसायास मिळालेला प्रचंड प्रतिसाद हे त्यांच्यावरील लोकांच्या प्रेमाचे, आण्णांच्या जनसंपर्काचे आणि विश्वासार्ह्यतेचे उदाहरण होते.

आपल्या वडिलांच्याच लौकिकाचा कित्ता गिरवीत माधवरावांच्या सहाही मुलांनी आपापल्या क्षेत्रात उंची गाठत, परिवाराचे नाव आणि पत मोठी केली. मुलांप्रमाणेच माधवरावांची नातवंडेही कुठे कमी नाहीत. झी मराठीच्या सा रे ग म प मधून सातासमुद्रापार गाजलेला अनिकेत सराफ हा माधवरावांचा नातू आज माधवरावांचे कला क्षेत्रातील अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

परभणी येथे २००७ मधे झालेल्या तिसऱ्या बहुभाषिक ब्राह्मण महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष परिवारातील श्री. विजय(बंडू) सराफ यांच्यासह सराफ परिवाराचे या सामाजिक सोहळ्यातील योगदान खरोखरीच स्तुत्य होते.

सराफ परिवाराच्या यशस्वी वाटचालीला पूरक जोड लाभली ती परिवाराशी जुळलेल्या नात्यांची. माधवरावांच्या आणि त्यांच्या मुलांच्या व्याह्यांची.

वैष्णवी वधू-वर सूचक केंद्राच्या संचालिका सौ. सीमा रत्नाकर सराफ यांचे वडिल स्व. श्री. विठूकाका जोशी पिंपळगावकर हे माधवरावांचे व्याही, त्यांचे कार्य आणि जगन्मीत्रता मराठवाड्यास ज्ञात आहे.

या सर्व पारिवारिक पार्श्वभूमीचा, लोकासंग्रहाचा आणि तळमळीचा एक तंत्रशुध्द मेळ घालून आज 'विवाह' या ब्राह्मण ज्ञातीमधील एका महत्वाच्या संस्कारात आणि विवाह संस्थेतील आजच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यात काही मदत करता यावी, जीवनात अतिशय महत्वाचा घटक असणारा जोडीदार शोधण्यास समाजातील अनुरूप तरुण-तरुणींना सुखकर व्हावे ही आमच्या या उभारणी मागील भावना.